निविदा प्रक्रिया

नगर परिषद येथे पार पाडण्यात येणाऱ्या निविदा प्रक्रिया 

अभिकरण (Agency) द्वारा काम पार पाडणे

        अभिकरण म्हणजे agency द्वारा काम करण्याची पद्धत सहसा पालिकेमध्ये वापरली जाते. हे काम पार पाडताना सदर प्रक्रिया प्रचलित बाजारभावानुसार, चांगल्या गुणवत्तेने होणे आवश्यक असते. त्यासाठी कोणतेही काम करायचे असल्यास सर्वात आधी त्यास प्रशासकीय मान्यता आवश्यक असते. प्रशासकीय मान्यता ही, निधी कुठून उपलब्ध झाला आहे त्यानुसार घेतली जाते. जर नगरपरिषद स्वतःचा निधी वापरत असेल तर त्यास न.प. च्या सर्वसाधारण सभेची मान्यता असणे व मुख्याधिकारी यांची प्रशासकीय मान्यता असणे बंधनकारक असते. तसेच जिल्हास्तरावरून निधी वितरीत करण्यात आला असेल तर जिल्हाधिकारी यांची प्रशासकीय मान्यता आवश्यक असते. जिल्हा स्तरावरील निधी हा साधारणतः DPDC म्हणजेच जिल्हा वार्षिक नियोजन समिती अंतर्गत वितरीत केला जात असते. यामध्ये विविध योजनांचे निधी वितरीत केले जातात. काही निधी हे थेट राज्य स्तरावरून वितरीत होतात. काही केंद्राकडून वितरीत होतात. 
        प्रस्तावित कामासाठी वितरीत केलेला निधी हा प्राप्त करून घेण्यासाठी संपूर्ण प्रस्ताव हा तत्सम प्राधिकारी यांना मान्यतेसाठी पाठवला जातो. उदा. दलितेतर योजना जिल्हा स्तर या साठी परिपूर्ण प्रस्ताव हा जिल्हाधिकारी यांना मान्यतेस पाठवला जाईल. या प्रस्तावात योजनेच्या शासन निर्णय किंवा परिपत्रकात नमूद सर्व बाबींची पूर्तता करावी लागते. यात प्रामुख्याने तांत्रिक मान्यता हि बाब खूप महत्वाची असते.
        तांत्रिक मान्यता हि सक्षम तांत्रिक पप्राधिकरण यांचेकडून प्राप्त केली जाते. यासाठी महाराष्ट्रात प्रामुख्याने PWD सार्वजनिक बांधकाम विभाग, MJP महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,  MEDA महाराष्ट्र एनर्जी डेवलपमेंट अथोरीटी व इतर महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी प्राधिकृत केलेल्या संस्था काम करतात. या साठी ह्या संस्था कामाच्या 1-2 % पर्यंत तांत्रिक मान्यता शुल्क आकारतात. या संस्था कामाचे मुल्य, अंदाज पत्रक व इतर सर्व तांत्रिक बाबींची तपासणी करतात.

Comments